गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भूदान यज्ञासाठी दान केलेली जमीन परत दात्याच्या नावे फेरफार करता येत नाही, हे अधिनियम स्पष्टपणे सांगत असताना वरूड तालुक्यातील बहादा गावात थेट दात्याच्या वारसाच्या नावे भूदान जमिनीचा फेरफार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोर्शीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांनी अधिनियमाच्या तरतुदींचा भंग करीत फेरफार आदेश दिला असून, संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी तो प्रत्यक्षात अमलात आणला.
बहादा येथील गुलाबराव झ्यापुजी पाटील यांनी त्यांच्या मालकीची सर्व्हे क्र. ६९ अंतर्गत २६.१८ हेक्टर जमीन भूदान यज्ञासाठी दान केली होती. ही जमीन भूदान यज्ञ अधिनियम १९५३ च्या कलम १७ (७) अंतर्गत स्वीकारली गेली असून, कलम १७ (८) नुसार तिचे स्वामित्व भूदान यज्ञ मंडळाकडे निहित झाले. अधिनियमाच्या कलम १९ अनुसार अशी जमीन दाता परत मागू शकत नाही, वा ती कोणत्याही स्वरूपात त्याला परत देता येत नाही. भूदान यज्ञ मंडळाद्वारे ही जमीन मारुती गणू चौधरी (२१.६० हे.) व चिका आलम गोंड (४.५८ हे.) यांना कसण्याकरिता देण्यात आली.
मात्र, भूदान दाता यांचा वारस साहेबराब गुलाबराव पाटील यांनी ग्राहक पंचायतीमार्फत एसडीओ यांच्याकडे अर्ज दाखल करून जमिनीचा ताबा देण्याची मागणी केली. तत्कालीन एसडीओ यांनी नियम डावलून गट नं. २०६ व २०९ वरील संबंधितांच्या वहितीचा अधिकार संपुष्टात आणला.
स्वामित्व विसर्जित, तरी फेरफार कसा ?भूदानात दिलेली जमीन परत मागण्याचा अधिकार अधिनियमाचे कलम १९ नुसार नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे भूदान दात्याच्या वारसाचा अर्ज फेटाळण्यात यावा, तत्कालीन तलाठी बहादा व मंडळ अधिकाऱ्यांनी रुजू केलेले फेरफार रद्द करून सातबारा उताऱ्यावरील साहेबराव गुलाबराव पाटील यांचे नाव निर्लेखित करण्यात यावे व पूर्वस्थिती कायम करण्याची मागणी भूदान यज्ञ मंडळाद्वारा करण्यात आली आहे.
"भूदान यज्ञ अधिनियम १९५३ मधील कलम १९ मधील तरतुदीचे उल्लंघन करून तत्कालीन एसडीओ मोर्शी यांनी आदेश पारित केला आहे. त्याचे पुनर्विलोकन करण्याची मागणी आम्ही अर्जाद्वारे केली आहे."-नरेंद्र बैस, संयुक्त सचिव, (भूदान अंकेक्षण) भूदान यज्ञ मंडळ