अमरावती : जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून मिळालेल्या १३ व्या वित्त आयोगाचा निधी वाटपात अन्याय करण्यात आल्याने आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद होण्याचे संकेत आहेत. राज्य शासनाने जिल्हा परिषदेला १३ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करुन दिला आहे. मात्र हा निधी वाटपाबाबतच्या नियोजनात सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. अशातच विरोधात असलेल्या शिवसेना, भाजपा व मित्रपक्षाच्या सदस्यांना निधी देताना दुजाभाव करण्यात आल्याची तक्रार शिवसेनेचे गटनेते सुधीर सूर्यवंशी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. मेळघाटातील दुर्गम भागात असलेल्या गावांमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना विकासकामे करताना अडचणी येतात. त्यामुळे विकासकामांसाठी मिळणारा निधी कमी असताना यापूर्वी कुठलाही विकासनिधी सर्व सदस्यांना समसमान वाटप करण्याबाबतचा निर्णय जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. मात्र या ठरावाला बाजूला सारत सत्ताधारी गटाने १३ व्या वित्त आयोगाचा निधी आपल्या सहकारी सदस्यांना सर्वाधिक देऊन विरोधी सदस्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे धोरण अन्यायकारक असून सर्व सदस्यांना निधी समसमान वाटप करण्यात यावा, अन्यथा याविरोधात वेळप्रसंगी आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा सूर्यवंशी यांनी दिल्याने हा वाद आता पेटण्याची शक्यता बळावली आहे.
निधी वाटपावरुन पुन्हा वाद
By admin | Updated: February 18, 2015 00:03 IST