यशोमती ठाकूर : जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचे निवेदन अमरावती : तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील पाझर तलाव २०११-१२ मध्ये पाण्याचा दाब वाढून फुटला होता. या तलावात गाळ साचला आहे. भिंत फुटण्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जलयुक्त शिवारमधून या तलावाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तिवसा तालुक्यातील अनकवाडी, शिरजगाव येथील पांदण रस्त्यासाठी २४ लाखांचा निधी प्राप्त झाला. मात्र, कामाला सुरुवात झालेली नाही. या कामात तांत्रिक अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या वहीवाटीची सोय होण्यासाठी प्रलंबित पांदण रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी आ. ठाकूर यांनी केली. कुऱ्हा येथे तात्पुरती पूरक पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा योजना यांच्याकडे सादर केला. दुरूस्तीअभावी पाईपलाईन वारंवार लिकेजेस होत आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीद्वारा एका शेतकऱ्याची विहीर अधिग्रहण केली व त्यावर १४ व्या वित्त आयोगातून १६ लाखांचा खर्च करण्यात आला. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तीन किलोमीटर अंतरातील पाईपलाईनची आवश्यकता आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मंजूर द्यावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे केली. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवारात व्हावी पाझर तलावाची दुरूस्ती
By admin | Updated: January 3, 2017 00:15 IST