मागणी : महापालिका आयुक्तांना दिले निवेदन अमरावती : स्थानिक रामपुरी कॅम्प परिसरातील महानगर पालिकेच्या बगिचा लगतच्या खुल्या जागेवर अतिक्रमण करून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले देशी दारूचे दुकान तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी परिसरातील रामपुरी कॅम्प, सिध्दार्थनगर, भीमनगर, सिव्हीललाईन परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या दुकानाला काही अधिकाऱ्यांचे अभय असल्याने हे दारू दुकान बिनदिक्कतपणे सुरू असल्याचा आरोपही परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. या दारू दुकानाजवळ हिंदी-सिंधी हायस्कूल, सार्वजनिक वाचनालय व बुध्दविहार आहे. या दारू दुकानासमोरून ये-जा करताना नागरिक व महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दारूडे दारू पिऊन भांडणे करतात. दारू दुकानासमोरच शाळा असल्याने विद्यार्थ्यांची मोठी कुचंबणा होते. बगिचाला लागूनच दुकान असल्याने महिला तसेच मुलांना उद्यानातही मोकळेपणाने वावरता येत नाही. या बगिचाला मद्यपींच्या अड्ड्याचे स्वरूप आले आहे. हे दारूचे दुकान हटविण्यासाठी यापूर्वी सुध्दा निवेदन देण्यात आले होते. परंतु दुकान मालक तसेच अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याने दुकानदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. दारू दुकान तातडीने हटविण्याची मागणी पद्मा तायडे, सुवर्णा प्रधान, ज्योती चौबारे, मोहिनी गायगोले, प्रमिला वानखडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
रामपुरी कॅम्प परिसरातील दारूचे दुकान हटवा
By admin | Updated: November 17, 2015 00:21 IST