अमरावती : महापालिकेत अपंगांची नोंदणी सुरु करण्यात आली असून त्यांना शासनाच्या निर्णयानुसार व्यवसाय आणि रोजगारभिमुख मदत केली जाणार आहे. बुधवारपर्यत महानगरातील २२४ अपंग बांधव असल्याची नोंद करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी आस्थापना तसेच विकास कामांवर होणारा खर्च वजा करता ३ टक्के निधी हा अपंगाचे पुनर्वसन अथवा उत्थानासाठी खर्च करणे अनिवार्य आहे. अपंगाना कोणत्या प्रकारचे सहकार्य करावे, याबाबत महापालिकेने धोरण निश्चित केले नाहीे. मात्र, शहरातील अपंगाची यादी, शिक्षण, कुटुंबांची सविस्तर माहिती आदी डाटा महापालिकातयार करीत आहे. त्याअनुषंगाने अपंगाची नोंद करुन घेण्यासाठी अर्ज भरुन घेतले जात आहे. येत्या काळात अपंगांना व्यवसाय व रोजगारभिमुख मदत करण्याचे प्रशासनाचे धोरण आहे. आमसभेत एकदा निर्णय झाला की, त्यानुसार अपंगांना मदत केली जाणार आहे. शहरात अपंगांची संख्या किती? यापासून प्रशासन अनभिज्ञ असले तरी नवीन नोंदणीनंतर ही संख्या निश्चित होईल, यात दुमत नाही. अपंगांच्या मागणीप्रमाणे मदत करण्याचे धोरण प्रशासन करणार आहे. मात्र, यात व्यवसाय, रोजगारभिमुख बाबीला प्रधान्य दिले जाणार आहे. राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना सप्टेंबरच्या निर्णयानुसार अपंगांच्या उत्थानासाठी विविध उपक्रम, योजना राबविण्याचे आदेशीत केले आहे. त्यानुसार आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार शहरातील अपंगाची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. तीन टक्के वेलफेअर निधी खर्च करण्याचे धोरण प्रस्तावित आहे. (प्रतिनिधी)
अपंगांची नोंदणी सुरु
By admin | Updated: December 3, 2015 00:24 IST