परतवाडा- मेळघाटात बालमृत्यू कमी करण्यासाठी डॉक्टरांनी २४ तास रुग्णालयात हजर राहावे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी यात जातीने लक्ष घालून सहा महिने ठाण मांडून बसावे, बालमृत्यूचे प्रमाण कमी न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आदेश आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम भागाच्या भेटीदरम्यान दिले.
मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात मागील आठ महिन्यांत बालमृत्यू, उपजत मृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण वाढल्याने दीपक सावंत यांनी शनिवारी मेळघाटचा दौरा केला. चिखलदरा तालुक्यातील आवागड, काटकुंभ, डोमा, चुरणी आदी गावात भेटी दिल्या. येथे असलेल्या उणिवा पाहून त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
डोमा येथील अंगणवाडी केंद्रातील खिचडीमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले. कुपोषित बालकांसाठी सुरू केलेल्या व्हीसीडीसी केंद्राची पाहणी केली. काटकुंभ आरोग्य केंद्राला भेट दिली. चुरणी ग्रामीण रुग्णालयात बैठक घेतली. यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी आसोले, तालुका आरोग्य अधिकारी सतीश प्रधान उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे मिश्रिलाल झाडखंडे व गणेश राठोर यांनी काटकुंभ येथे १०८ या रुग्णवाहिकेची मागणी केली. रिक्त जागांसदर्भातही त्यांना माहिती देण्यात आली.
अहवाल मागविलामेळघाटात सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी सेवा देताना काय केले याचा अहवाल देण्याचे आदेशही ना. दीपक सावंत यांनी दिले. मेळघाटात स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती असून त्यांच्या कामाचा संपूर्ण अहवाल द्यावा असेही त्यांनी बजावले.