विशेष शिबिर : रामपुरी कॅम्प, बडनेरा झोनचा समावेश अमरावती : महापालिका प्रशासनाने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस विशेष शिबिर आयोजित करून ५८ लाख रुपयांची वसुली केली आहे. या विशेष मोहिमेत झोन क्र. १ रामपुरी कॅम्प, झोन क्र. ४ बडनेराचा समावेश आहे.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार कर मूल्यांकन व निर्धारक विभागाचे प्रमुख महेश देशमुख यांनी मालमत्ता कराचे अर्थसंक ल्पात ५० कोटी रुपये उत्पन्न वसुलीसाठी कृतिआराखडा तयार केला आहे. नोव्हेंबर महिन्यात मालमत्ता कराची वसुली ही ११ कोटींच्या घरात असली तरी पुढील तीन महिने ते वसुलीसाठी मोहीम राबविली जात आहे. महापालिका पाचही झोनमध्ये कर वसुली शिबिर राबवून कर लिपिक नागरिकांच्या दारी हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. त्यानुसार गत दोन दिवसात झोन क्र. १ व ४ मध्ये मालमत्ता कर वसुली विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रतिसादही दिला आहे. मात्र जानेवारीपासून कराची थकीत रक्कम भरल्यास दोन टक्के दंडात्मक रक्कम व्याज दर आकारले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांवर दोन टक्के व्याज भरण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने कर वसुली शिबिराचे आयोजन केले आहे. शनिवारी पार पडलेल्या विशेष शिबिरात रामपुरी कॅम्प झोन क्र. १ मध्ये ११ लाख ३० हजार तर झोन क्र. ४ बडनेरा येथे २० लाख १९ हजार रुपये कर वसुलीतून गोळा झाले. रविवारी पार पडलेल्या विशेष शिबिरात झोन क्र. १ मध्ये १६ लाख रुपये तर झोन क्र. ४ बडनेरा येथे १० लाख ४८ हजार रुपये जमा झाले. दोन दिवसांत मालमत्ता कराचे एकूण ५८ लाख रुपये जमा झाले. सुटीच्या दिवशी मालमत्ता कर वसुली विशेष शिबिर राबविले जाईल, अशी माहिती सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे यांनी दिली.
मालमत्ता करातून ५८ लाखांची वसुली
By admin | Updated: December 15, 2015 00:19 IST