अमरावती : मतदानाच्या टक्केवारीत सातत्याने घट होत असल्याने आयोगाची चिंता वाढली होती. यासाठी आयोगाव्दारा मतदान जनजागृतीसाठी ‘स्वीप’ अभियान राबविण्यात आले. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आयोगाचे मतदान जनजागृती निरीक्षक आशिष गोयल नुकतेच जिल्ह्यात येऊन गेले. मतदारांचा उत्साह वाढविण्यासाठी नवनवीन कल्पना राबविली जात आहे. अनेक सामाजिक संघटना, अंगणवाडी सेविका व स्थानिक मतदान केंद्रप्रमुख (बीएलओ) यांची मदत घेतली जात असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी विक्रमी राहण्याची शक्यता आहे.मतदान तीन आठवड्यांवर येऊन ठेपले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महायुती व आघाडीमध्ये स्वबळावर लढण्याची भाषा बोलली जात आहे. या साऱ्या प्रकारात निवडणुकीचा प्रचार रंगात येणार आहे. या विधानसभा निवडणुकांना दसरा, नवरात्रोत्सव व दिवाळीची पार्श्वभूमी आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.मागील निवडणुकींच्या आढावा घेतला असता असे लक्षात आले की, मतदानाच्या दिवशी दिली जाणारी सुटी सहलीसाठी किंवा मौजमजेसाठी वापरली जात होती. मतदारांकडून मतदानाला पाठ दाखविण्यात आल्याने मतदानाची टक्केवारी घटत होती. लोकसभे पाठोपाठ विधानसभा निवडणुकांना राजकीयदृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. देशाच्या राजकारणात राष्ट्रीय पातळीवर झालेल्या राजकीय घडामोडी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणीटंचाईसाठी झालेली आंदोलने त्यातून ढवळलेले राजकारण सर्वसामान्यांसह युवकांमध्ये झालेली जनजागृती व नवमतदारांची अधिक नोंदणी, जिल्ह्यात वाढलेले ७० हजार नवमतदार, या बाबींचा परिणाम साधून यावेळी मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मतदानाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ अपेक्षित
By admin | Updated: September 25, 2014 23:17 IST