नगरपंचायत निवडणूक : संगणकीकृत प्रक्रियेत उमेदवारांना तांत्रिक अडचणीअमरावती : नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज व शपथपत्र सादर करण्याच्या संगणकीय प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक कारणांनी अडचणी येत आहेत. त्यामुळे हस्तलिखित अर्ज स्वीकृतीस आयोगाने मान्यता दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चारही नगरपंचायतींना याविषयी कळविले आहे. यामुळे अखेरच्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाच्या २९ सप्टेंबरच्या आदेशानुसार विहित नमुन्यामध्ये उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र संगणक प्रणालीव्दारे भरणे शक्य नाही, अशी जिल्हाधिकाऱ्यांची खात्री झाल्यास उमेदवारांना हस्तलिखित उमेदवारी अर्ज व शपथपत्रे भरण्याची मुभा देण्याचे आयोगाचे निर्देश आहेत. जिल्ह्यात तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी येथे नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज व शपथपत्रे सादर करण्यास उमेदवारांना इंटरनेट संदर्भात अडचणी उद्भवत असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी या तांत्रिक दोषांंविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने ७ व ८ आॅक्टोबर रोजी हस्तलिखित उमेदवारी अर्ज भरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी आयोगाच्या निर्देशानुसार परवानगी दिली. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज व शपथपत्र उमेदवारांना सहजरीतीने भरता यावे, यासाठी ‘महाआॅनलाईन’च्या मदतीने एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. ही वेबसाईट उघडून उमेदवारांनी यामध्ये माहिती भरावी. आवश्यकतेनुसार दुरुस्ती करुन त्याचे प्रिंटआऊट काढावे लागतील व त्यावर स्वाक्षरी करुन ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागते. आता संगणकीकृत अर्जासोबतच हस्तलिखित अर्जही सादर करता येणार आहे. (प्रतिनिधी)
हस्तलिखित उमेदवारी अर्जास आयोगाची मान्यता
By admin | Updated: October 8, 2015 00:11 IST