कुलगुरुंनी स्वीकारले निवेदन : जिल्हाकचेरीवर शेकडो विद्यार्थी एकवटले अमरावती : विद्यार्थी आणि विद्यापीठाशी संबंधित विविध मागण्या, प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शुक्रवारी येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर भव्य मोर्चा काढून धडक दिली. निवेदन स्वीकारण्यासाठी कुलगुरु मुरलीधर चांदेकर हे स्वत: मोर्चाला सामोरे गेलेत, हे विशेष. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, प्रदेश उपाध्यक्ष निखिल ठाकरे यांच्या नेतृत्वात विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले. राविकाँने विद्यापीठातील भोंगळ कारभार, विद्यार्थ्यांना होणारा नाहक त्रास, परीक्षा शुल्क माफ करण्यासह अन्य प्रश्नांवर हात घातला. कुलगुरु चांदेकर यांनी पदाची सूत्रे स्वीकारली असली तरी विद्यापीठातील व्यवस्था जैसे थे असल्याचा आरोप करण्यात आला. परीक्षा विभागाचा मंद कारभार, अवेळी निकाल, राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशींची अंमलबजावणीचा अभाव असल्याचे निवेदनात म्हटले आहे. केंद्राकडून विद्यापीठाला दरवर्षी कोट्यवधींचे अनुदान मिळत असताना विद्यार्थ्यांच्या हितासाठी चांगले निर्णय घेतले जात नाही, असा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष निखिल ठाकरे यांनी केला. निवेदनात मागण्यांची पूर्तता १५ दिवसांत करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
राविकाँची विद्यापीठावर धडक
By admin | Updated: December 31, 2016 01:23 IST