प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप : विजयाच्या जल्लोषात घडला प्रकारअमरावती : बडनेरा मतदारसंघाचे विजयी उमेदवार रवी राणा यांच्या रॅलीमध्ये अपक्ष उमेदवार विनेश आडतीया व रवी राणांचे समर्थक आमने-सामने आले होते. यावेळी राणांच्या समर्थकांनी विनेश आडतीयांवर प्राणघातक हल्ला चढविला असा आरोप आडतीया यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होताच बडनेरा मतदार संघातील अपक्ष उमेदवार रवी राणा यांची विजयी रॅली काढण्यात आली. विजयाचा जल्लोष सुरु असतानाच जयस्तंभ चौकातील गर्दीमध्ये विनेश आडतीया व त्यांचा सुरक्षा रक्षक राहुल मुळे यांचे वाहन अडकले. यावेळी रवी राणा यांच्या समर्थक दीपक जलतारे, स्वप्निल बोरेकर, अनूप अग्रवाल, चंदू जावरे, सचीन भेंडे यांनी विनेश आडतीयांसोबत हुज्जतबाजी करुन मारहाण केली, असा आरोप विनेश आडतीया यांनी केला आहे. याबाबत विनेश आडतीया हे शहर कोतवालीच्या ठाणेदारांकडे तक्रार घेऊन गेले होते. मात्र त्यांनी पोलीस उपायुक्त बी. के. गावराने यांच्या निर्देशानुसार तक्रार दाखल करा, असे त्यांना सांगण्यात आले. रवी राणांशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
रवी राणा समर्थक, विनेश आडतीया आमने-सामने
By admin | Updated: October 19, 2014 23:13 IST