हालचाली : जिल्हा रेशन दुकानदार संघटनेची भूमिका अमरावती : शंभर रुपये किंमतीमध्ये तूरडाळ उपलब्ध करुन देण्याचा दावा करणाऱ्या शासनाने आता हीच डाळ १२० रुपये प्रतीकिलोने रेशनवर उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. मात्र शासनाकडून मिळणाऱ्या अत्यल्प कमिशनमध्ये ही डाळ शिजणार नसल्याने आता अमरावती जिल्हा प्राधीकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन विक्रेता (वेलफेअर) संघाने डाळ विक्रीस नकार देण्याची तयारी सुरु केली आहे.७० रुपये किलोच्या घरात असलेली तूरडाळीचे दर मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यापासून चढत गेले .हे दर दिडशे ते तिनशे रुपये प्रती किलोपर्यत पोहोचले होते. डाळीचे दर कमी करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात व्यापाऱ्यांनी साठेबाजी करुन ठेवलेली शेकडो टन डाळ सरकारने जप्त केली. हीच डाळ रेशनवर शंभर रुपये किमतीने उपलब्ध करुन देण्यात येणार होती. नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यत कॉर्पोरेट कंपन्यानी तेरा वेगवेगळया प्रकारच्या तूरडाळीचे ब्रॅन्ड बाजारामध्ये आणले .त्यांना मागणी नसल्याने हीच डाळ त्याच किमतीने रेशनवर उपलब्ध करुन देण्याची शक्यता ग्राहक पंचायतीने व्यक्त केली आहे.जिल्हा रेशन दुकानदार संघटनेने १२० रुपये दराने होणाऱ्या डाळविक्रीला विरोध करण्याची तयारी सुरु केली आहे. याबाबत आमच्याशी कुठलीही चर्चा केली नसल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील उल्हे यांनी सांगितले. त्यामागे किती रुपये अनुदान देण्यात येईल, याची माहिती जाहीर केलेली नाही .बाजारात शंभर रुपये दराने तूरडाळ उपलब्ध असताना रेशनवर हीच डाळ १२० रुपये दराने का घ्यायची ,असा प्रश्नही रेशन दुकानदार जिल्हा संघटनेने केला आहे.
शासकीय तूर डाळीला रेशन दुकानदारांची ‘ना’
By admin | Updated: July 9, 2016 00:13 IST