गोपाल डाहाके
मोर्शी : येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने निकृष्ट दर्जाचा गहू तसेच जनावरांनाही खाण्यायोग्य नसलेला मका रेशन कार्डावर वितरित केल्याचा प्रकार उघड झाला होता. तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत संबंधित रेशन दुकानदार दोषी आढळला आहे. त्याबाबतचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.
‘लोकमत’ने १ व ३ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्याची तातडीने दखल घेत तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने सदर स्वस्त धान्य दुकान गाठून झाडाझडती घेतली. सदर दुकानामध्ये शासकीय गोदामातील भरडधान्य आढळून आले नाही. एकूण मक्याचा उपलब्ध साठा २ क्विंटल १४ किलो आढळून आला. त्यापैकी १ क्विंटल १४ किलो निष्कृष्ट होता. त्या अनुषंगाने मोर्शी येथील शासकीय धान्य गोदाम रक्षकाचे बयान नोंदविण्यात आले. त्यांच्या बयानानुसार फेब्रुवारी व मार्चमध्ये शिधापत्रिकाधारकांना वाटपाकरिता शासकीय गोदामात एफएक्यू दर्जाचा मका प्राप्त झाला आहे. सध्या तरी शासकीय धान्य गोदामात निकृष्ट दर्जाचा नॉन एफएक्यू मका प्राप्त झालेला नाही तसेच असा मका आढळल्यास तो परत घेऊन त्याबदल्यात एफएक्यू दर्जाचा मका वितरित केला जातो. येथील शासकीय धान्य गोदामात असलेले धान्य व दुकान नंबर ७१ या दुकानदाराकडे असलेले धान्य यामध्ये तफावत आढळून आला.
सदर स्वस्त धान्य दुकानदाराने संबंधित शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट दर्जाच्या मक्याचे वाटप केले आहे, असा अहवाल येथील तहसीलदार सिद्धार्थ मोरे व पुरवठा निरीक्षण अधिकारी विलास मुसळे यांनी तयार केला. सदर प्रकरणाचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
-----------------