ट्रकला विद्युत तारेचा स्पर्श : शॉर्टसर्किटमुळे पेटल्या रुईच्या गाठी दर्यापूर : शहरातील शिवर रस्त्यावरील धनलक्ष्मी जिनिंग प्रेसिंगच्या आवारातील ट्रकमधील रुईच्या गाठींना विद्युत तारेचा स्पर्श होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अंदाजे ७ लाख रूपयांची हानी झाली. काही गाठींना वाचविण्यात यश आले. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान धनलक्ष्मी जिनिंग परिसरात घडली.सविस्तर वृत्त असे की, शिवर रस्त्यालगत धनलक्ष्मी जिनिंग आहे. सकाळी कपाशीवर प्रक्रिया करून जिनिंग झालेल्या कपाशीच्या रूईच्या १० ते १२ लक्ष रूपये किमतीच्या गाठी असलेला ट्रक प्रेसिंगकरिता अन्य जिनात नेण्याकरिता भरून उभा होता. हा ट्रक पुढे निघाल्यानंतर आकस्मात विद्युत तारेचा स्पर्श होऊन गठाणींनी पेट घेतला. यात ७ लाख रूपयांचे नुकसान झाले. ट्रक काही अंतरावर गेल्यानंतर ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आली. परंतु हवेमुळे गाठींनी चांगलाच पेट घेतला. घटनेची माहिती दर्यापूर पोलिसांना मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दोन फेरीनंतर आग नियंत्रणात आली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुधाकर भारसाकळे, रामेश्वर चव्हाण, नगरसेवक असलम घाणीवाले, प्रभाकर पाटील तराळ, दिवाकर देशमुख, ईश्वर बुंदिले यांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. ठाणेदार जे.के.पवार, वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता मोहित चांदुरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. (प्रतिनिधी)
दर्यापुरात जिनिंगला आग सात लाखांचा कापूस खाक
By admin | Updated: May 10, 2015 23:58 IST