कापड खरेदीच्या व्यवहारात फसवणूक : एका व्यापाऱ्याला अटकअमरावती : लेडीज सूट खरेदीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अमरावतीमधील एका कापड व्यापाऱ्याला सुरत पोलिसांनी शुक्रवारी सुरत येथूनच अटक केली. दिपेश प्रकाश गेमनानी (रा.सिंधी कॅम्प, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने अमरावतीसह मुंबई व अन्य काही शहरांतील व्यापाऱ्यांना कापड विक्री केल्याचे सुरतमधील सलाबतपुरा पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता तखतमल इस्टेटचे व्यापारी सुरत पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती हाती आली आहे. शनिवारी आरोपी दिपेशला न्यायालयात हजर करून पोलिसांनी कोठडीची मागणी केली. सुरत येथील पोलीस सूत्रानुसार, अमरावतीच्या सिंधी कॅम्प परिसरातील रहिवासी दिपेश गेमनानी याने सुरत शहरातील सलाबतपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिंगरोडवर भाड्याने दुकान घेऊन लेडीज सूट विक्रीचा व्यवसाय सुरु केला. दिपेशने सुरत येथील एमटी मार्केटस्थित अक्षद याकुब (४६, रा. माकडा) या व्यापाऱ्याकडून ८० लाख ८४ हजार ६१० रुपयांचा लेडीज सूटचा माल खरेदी केला होता. मात्र, अक्षद यांनी विक्री केलेल्या कापडांची रक्कम मागितल्यावर दिपेशने रक्कम देण्यात टाळाटाळ केली. त्यामुळे व्यापारी अक्षद याकुब यांनी सलाबतपुरा पोलीस ठाण्यात दिपेश गेमनानीविरुध्द तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून सलाबतपुरा पोलिसांनी दिपेश गेमनानी यांच्यासह विजय गोविल, गोविंद कलावाणी, प्रकाश मन्साराम गेमनानी (रा. अमरावती), जय माता दी टेक्सस्टाईलचे संचालक, संस्कारी साडीचे संचालक (महालक्ष्मी मार्केट, सुरत), व अमित फॅशनचे संचालक (मुंबई) यांच्याविरुध्द भादंविच्या कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणात पोलिसांनी दिपेश गेमनानेला अटक केली आहे. अन्य सहा आरोपी अद्यापही फरार आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता सलाबतपुरा पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणाचा तपास सलाबतपुरा पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस निरीक्षक जे.टी.सोनारा यांच्याकडे आहे. (प्रतिनिधी)तखतमल इस्टेटमधील व्यापाऱ्याची चौकशी ?अमरावतीमधील रहिवासी दिपेश गेमनानी याने सुरत येथे दुकान थाटून अनेकांची फसवणूक केल्याचे सलाबतपुरा पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. दिपेशने सुरत येथील व्यापाऱ्यांकडून रेडिमेड कापड खरेदी करून तो माल अन्य शहरातही विक्री केल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत उघड झाले आहे. दिपेशने तो माल अमरावतीच्या जयस्तंभ चौकस्थित तखतमल इस्टेट या मार्केटमधील व्यापाऱ्यांनाही विक्री केल्याचा संशय सलाबतपुरा पोलिसांना आहे. त्यामुळे आता सुरतचे पोलीस तखतमल इस्टेटमधील काही व्यापाऱ्यांची चौकशी करण्याकरिता अमरावतीत येण्याची शक्यता आहे. तखतमल इस्टेटमधील बहुतांश व्यापारी वर्ग सुरत येथूनच कपडा खरेदी करतात. त्यामुळे तो माल अमरावतीच्या व्यापाऱ्यांनीही खरेदी केल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दिपेशला अटक केल्यामुळे तखतमल इस्टेटमधील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अमरावतीचे व्यापारी सुरत पोलिसांच्या रडारवर
By admin | Updated: January 10, 2016 00:09 IST