वरूड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीसाठी नगर परिषद, वरूडकडून वेळोवेळी आश्वासन देण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात आजपर्यंत पुतळ्याची उभारणी करण्यात आली नाही. यापूर्वी या मागणीसाठी वरूड शहरात अनेक संघटनांचे उपोषण, आंदोलन झाले व नगर परिषदेकडून आंदोलनकर्त्यांना पुतळ्याची त्वरित उभारणी करण्यात येईल, असे आश्वासन देऊन शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना दुखविण्याचे काम करून वेळ मारून नेण्याचा प्रताप नगर परिषदेने केला; यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तातडीने उभारावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा प्रज्ञा बोडखे यांनी दिला आहे.
वरूड हे मोठे शहर असून वरूड तालुकासुद्धा लोकसंख्येने मोठा आहे. शिवाजी महाराजांचे मावळे या शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. वरूड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची त्वरित उभारणी व्हावी ही मागणी वारंवार होत आहे. मात्र नगर परिषदेकडून दुर्लक्ष होत असल्याो महाराजांचे मावळे दुखावले जातात, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. तरी शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीची वेळ आलेली आहे, यासाठी सर्व मावळ्यांनी एकत्र येऊन एक मोठे आंदोलन उभारण्याची वेळ आज आपणा सर्व मावळ्यांवर आलेली आहे, असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडचे कोषाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रज्ञा बोडखे यांनी नगर परिषदेकडे केले आहे. नगरपरिषद या मागणीकडे दुर्लक्ष करीत असेल तर जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.