एसीपी डाखोरेंची कारवाई : अतिक्रमण काढलेअमरावती : इर्विन चौकातील शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयानजीक थाटलेले अतिक्रमण शनिवारी वाहतूक पोलिसांनीच काढले. याखेरीज पदपथावर खुलेआम उभ्या राहत असलेल्या पीयूसी व्हॅनला जामर लावण्यात आले. ‘वाहतूक शाखेला पुन्हा घेराबंदी’ असे सचित्र वृत्त शनिवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्ताची शहर वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त बळीराम डाखोरे यांनी तत्काळ दखल घेतली आणि सकाळी ११ च्या सुमारास पदपथावर उभ्या असलेल्या पीयूसी व्हॅनला 'जामर' लावण्यात आले. या व्हॅन चालकाविरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री ९ च्या सुमारास हे जामर काढण्यात आले. याखेरीज वाहतूक जवळून जाणाऱ्या रस्त्यावर पंक्चर जोडणाऱ्या व्यावसायिकावरही बीपी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या भागातील अन्य अतिक्रमण सुद्धा हटविण्यात आले. यापूर्वी ‘लोकमत’ने वाहतूक शाखा कार्यालयाला अतिक्रमणाने केलेल्या घेराबंदीचे वृत्त दिले होते. १५ ते २० दिवस या भागात कोणताही अतिक्रमणधारक फिरकला नाही. तथापी काही दिवसांपासून पुन्हा एकदा रस्त्यावर दुकानदारी थाटण्यात आली. वारंवार होणाऱ्या या अतिक्रमणाचा मुद्दा ‘लोकमत’ने रेटून धरला. पोलिसांनी तत्काळ दखल घेत ही कारवाई केली. तसेच सांबंधित अतिक्रमणधारकांना समजसुद्धा दिली. यापुढे या भागात कुठलेही अतिक्रमण सहन केले जाणार नाही, अशा शब्दात सहाय्यक पोलीस आयुक्त बळीराम डाखोरे यांनी त्यांना समज दिली आहे. याखेरीज इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील भागामध्येही मोठे अतिक्रमण थाटण्यात आले आहे. त्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. वाहतुकीला अडथळा करणाऱ्या वाहन चालकांसह अतिक्रमणधारकांवरही यापुढे सक्त कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे. (प्रतिनिधी)
पीयूसी व्हॅनला लागले 'जामर'
By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST