अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. संभाव्य लाटेचा धोका कमी करण्यासाठी नियमपालन, सातत्यपूर्ण जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा व विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी दिले.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बालकांवरील उपचारांसाठी ८० खाटांचा स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात आला, तसेच उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातही बालरुग्णांसाठी ऑक्सिजन बेड राखीव ठेवण्यात आले असून, खासगी बालरुग्णालयांतही ऑक्सिजन बेडची तजवीज करण्यात आल्यचो पालकमंत्र्यांनी सांगितले. 'चिल्ड्रेन वॉर्ड'ची पाहणी पालकमंत्र्यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत आदी यावेळी उपस्थित होते.
आता बाधितांची संख्या कमी झाली असली तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ना. ठाकूर यांनी केले. खासगी पेडियाट्रिक कोविड रुग्णालयात पारिजात हॉस्पिटलमध्ये ४० व गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये ६० खाटा असल्याचे सीएस डॉ. निकम यांनी सांगितले.
बॉक्स
आवश्यक मनुष्यबळाला प्रशिक्षण
संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. या साथीपासून बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपचार सुविधांत वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार आवश्यक मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यात आले आहे. खासगी बालरुग्णालयांतही खाटा आरक्षित ठेवण्यात येत आहेत. संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी ही तयारी करण्यात येत असल्याचे ना. ठाकूर यांनी सांगितले.