प्रवीण पोटे यांचे प्रतिपादन : श्रेणीवर्धित रुग्णालयाचे भूमिपूजन चांदूरबाजार : रुग्णसेवा ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचलीच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. राज्यातील शेवटचा माणूस सेवेपासून वंचित राहू नये हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. त्यांच हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता राज्य सरकार कार्य करीत आहे. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. कारण शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचविणे यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. याप्रसंगी चांदूरबाजार येथील ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धीत नवीन दुमजली इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर खासदार आनंदराव अडसूळ, आ. बच्चू कडू, जिल्हाधिकारी किरण गित्ते, नगराध्यक्ष रवि पवार, उपाध्यक्ष लविना आकोलकर, जि.प. सदस्य मनोहर सुने, बाळासाहेब वाकोडे, तहसीलदर शिल्पा बोबडे उपस्थित होते. यावेळी खा. आनंदराव अडसूळ यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांनी, तर संचालन व आभार प्रदर्शन उमेश आगरकर यांनी केले. या सोहळ्याला जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव, संध्या सालसकर अधीक्षिका, पारेख, सोनपराते, श्रीकांत महल्ले, अभियंता भावे, नितीन अंबाडेकर, न. पा. सदस्य उषा माकोडे, सरदारखाँ शहादत खाँ, स्वीकृत सदस्य सचिन खुळेसह आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर, कर्मचारी, भाजपा, प्रहार व शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त होणार येथील ग्रामीण रुग्णालयाला नव्या रुपासह उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त होणार आहे. त्यामुळे पुढील काळात रुग्णांना आवश्यक सर्व सुविधा याच रुग्णालयात उपलब्ध होतील. मतदारसंघाचा विचार करता एकाच मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांना उपजिल्हा रुग्णालय मिळणे ही राज्यातील एकमेव बाब आहे आणि हे फक्त अचलपूर मतदारसंघातच घडून आले आहे. त्यासाठी काय-काय प्रयत्न करावे लागले हे आ. बच्चू कडू यांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केले. सोबतच ग्रामीण भागात रुग्ण सेवा देण्यास डॉक्टर मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचविणार
By admin | Updated: January 2, 2017 01:11 IST