रवि राणांचा पुढाकार : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना साकडे अमरावती: मुंबई, नागपूर व पुणेनंतर आता अमरावतीतही मेट्रो सुरू करण्याच्या मागणीने जोर धोर धरला आहे. बडनेरा ते नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहत दरम्यान मेट्रोचा प्रस्ताव आ. रवि राणा यांनी निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. आ. राणा यांच्या मागणीनुसार, विदर्भात नागपूरनंतर अमरावती हे विभागीय स्तरावरील मोठे केंद्र आहे. अमरावती जिल्ह्याचा झपाट्याने विकास आणि विस्तार होत असल्याच्या पार्श्वभूमिवर मेट्रो सुरू करण्याच्या मागणीने यात विकासात्मकदृष्ट्या वाढ केली आहे. मेट्रोचा प्रस्ताव सादर करताना आ. राणांनी अमरावती महानगराचा प्रमुख भाग समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गलतच्या बडनेरा व नांदगाव पेठ या दोन प्रमुख शहरांना मेट्रोने जोडण्याचे त्यांनी प्रस्तावित केले आहे. भविष्यात नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात विविध उद्योग साकारले जाणार आहे. औद्योगिक वसाहतीमधील उद्योगधंद्याना कामगार, कुशल मनुष्यबळ लागणार आहे. बडनेरा शहरालगतच्या गाव, खेड्यातून मोठ्या संख्येने कामगार, मजूर हे रोजगारासाठी दरदिवशी अमरावती शहरात येतात. परंतु भविष्यात नांदगाव पेठ एमआयडीसीतील कारखाने, उद्योगधंद्यांना लागणारे कामगार, मजुरांना ये-जा करता यावी, यासाठी मेट्रो हे सुलभ व स्वत: असे साधन आहे. आ. राणांनी काळाची गरज लक्षात घेऊन बडनेरा ते नांदगाव पेठ एमआयडीसीदरम्यान मेट्रो सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र व राज्य शासनाकडे सादर केला आहे. नव्या वर्षात ही मागणी पूर्णत्वासाठी प्रयत्नांची परकाष्टा केली जाईल, असे आ. राणा यांनी बडनेरा येथे शनिवारी पार पडलेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात संकल्पदेखील सोडला, हे विशेष. मुंबई येथे एमएमआरडीसीच्या कार्यालयात सरत्या वर्षात मेट्रो विषयी बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, प्रवीण दराळे यांच्यासोबत आ. राणांनी बैठक घेतली आहे. (प्रतिनिधी) असा दिला मेट्रोचा मार्ग आ. रवि राणा यांनी बडनेरा ते नांदगाव पेठ एमआयडीसीदरम्यान मेट्रो सुरू करण्याची मागणी केली आहे. मेट्रोचा प्रस्ताव सादर करताना राणांनी मार्गदेखील सुचविला आहे. यात बडनेरा, साईनगर, गोपालनगर, नवाथे, राजापेठ, राजकमल चौक, कॉटनमार्केट चौक, इर्विन चौक, पंचवटी, अर्जुननगर, रहाटगाव पुढे नांदगाव पेठ या मार्गांचा समावेश केला आहे. पंचतारांकित एमआयडीसीत हे प्रकल्प येणार नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीत रेमण्ड, सियाराम कापड उद्योगांना मान्यता मिळाली आहे. इंडिया बुल्स औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. तसेच पतजंली फूड पार्क, भारत डायनामिक, हर्मन मेडिसीन प्रकल्प येणार आहे. टाटा, अशोक लेलॅण्डचे प्रकल्प लवकरच येणार असल्याची माहिती आ. रवि राणा यांनी दिली आहे. विकासाची पायाभरणी करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. मात्र नागरिकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याची नैतिक जबाबदारीसुद्धा आहे. त्यामुळे मजूर, कामगार, सामान्यांना ये-जा करता यावे, यासाठी बडनेरा ते नांदगाव पेठ दरम्यान मेट्रो सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नव्या वर्षात तो मार्गी लावणारच. - रवि राणा, आमदार, बडनेरा मतदारसंघ
बडनेरा ते नांदगाव पेठ मेट्रोचा प्रस्ताव
By admin | Updated: January 2, 2017 01:07 IST