केंद्र शासनाच्या निकषावर आधारित : ‘ग्रीन फिल्ड’ यादीत अमरावतीचे नावअमरावती : देशात स्मार्ट सिटीसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या २० शहरांत अमरावतीचा समावेश व्हावा, यासाठी केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारे महापालिकेने १७० पानांचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठविला आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या अथक प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे.‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेत समाविष्ट झाल्यानंतर केंद्र शासनाने निवड झालेल्या महापालिकांना ४३ प्रश्नांच्या प्रश्नावलीचा आराखडा प्रस्तावरुपाने पाठविण्याचे निर्देश दिले होते. १५ डिसेंबरपर्यंत हा प्रस्ताव केंद्राकडे सादर करणे अनिवार्य आहे. त्यानुसार महापालिकेने पाच विभागान्वये १७० पानांचा आराखडा प्रस्ताव स्वरुपात उपायुक्त चंदन पाटील यांना मंत्रालयात घेऊन जाण्याचे निर्देशित केले आहे. हा प्रस्ताव मंगळवारी केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाचे (स्मार्ट सिटी) सहसचिव संजय शर्मा यांच्याकडे सादर केला जाणार आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या अनुषंगाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजना, शहराची सद्यस्थिती, क्षेत्रविकास आराखडा, पॅनसिटी आराखडा, अंमलबजावणीबाबतचे नियोजन, आर्थिक नियोजन आदींचा समावेश या प्रस्तावात करण्यात आला आहे. या प्रस्तावासोबत डिव्हीडी, छायाचित्रे, क्षेत्रविकासाचे ‘एससीपी फॉर्मेट’ पाठविण्यात आले आहे. शासनाने केंद्राकडे पाठविलेल्या ग्रीन फिल्डच्या यादीत नाशिक, औरंगाबाद व अमरावतीचा समावेश असल्यामुळे पहिल्या २० शहरांच्या यादीत अमरावतीचे ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात नक्कीच नाव असणार, असा विश्वास आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी व्यक्त केला. ‘स्मार्ट सिटी’चा आराखडा पुणे येथील आलिया कंपनीने तयार केला आहे. मागील आठवड्यात राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी नागपूर विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’ फेज-२ साठी तयार केलेल्या प्रस्तावाचा आराखडा दाखविला आहे. राज्याने केंद्र शासनाकडे ‘स्मार्ट सिटी’साठी पाठविलेल्या १० शहरांमध्ये अमरावती शहराचे ग्रीन फिल्डमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात घोषित होणाऱ्या २० ‘स्मार्ट सिटी’च्या यादीत अमरावतीची निवड होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’चे मॉडेल निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या जागेचा तिढा सुटल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या बादफेरीत २० शहरांची निवड होणार आहे. शहराचा ‘स्मार्ट सिटी’त पहिल्या नंबर लागावे, यासाठी १०० टक्के प्रयत्न करण्यात आले आहेत. ४३ प्रश्नांच्या प्रश्नावलीत शहराला अव्वल स्थान मिळेल. इतर महापालिकांच्या तुलनेत अमरावतीचा प्रस्ताव सर्वांगिण आहे.- चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महानगरपालिका.
‘स्मार्ट सिटी’साठी १७० पानांचा प्रस्ताव पाठविला
By admin | Updated: December 15, 2015 00:09 IST