चिखलदरा : तालुक्यातील भुलोरी येथे संपत्तीच्या वादातून जन्मदात्या वडिलाने विवाहित मुलाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजता घडली. जखमी मुलाला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालय व पुढे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
अनिल जामूनकर (३०) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. वडील कालू जामूनकर (५०) व मुलगा अनिल यांच्यात शेती, बकऱ्या, इतर संपत्तीच्या वाटणीवरून बुधवारी वाद झाला होता. अनिल हा वेगळा राहत होता. गुरूवारी पुन्हा तो वडिलांच्या घरी आला. वडील जेवण करीत असताना अपमानजनक व शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात वडिलांनी त्याच्यावर कु-हाडीने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. ठाणेदार राहुल वाढवे यांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध भादंविचे कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला.
बॉक्स
१५ दिवसांत संपत्तीवरून दुसरा वाद
तालुक्यात दहेन्द्री येथे शेती व संपत्तीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची डोक्यावर लाकडी पाट मारून हत्या केली होती. गुरुवारी भुलोरी येथे वडिलांनी मुलावर कु-हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केले. तालुक्यात मागील १५ दिवसांत संपत्तीच्या वादातून ही दुसरी घटना घडली.