अमरावती : पोलिसांनी मारहाण केलेल्या हरीश शहा बाबा शहा (४०) याला जखमी अवस्थेत इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी मुस्लिम हेल्पलाईनचे पदाधिकारी हरीश शहाला भेटायला गेले असता पोलिसांनी पैसे मागितल्याचा पुरावा असल्याची बाब त्याने हेल्पलाईनसमोर उघड केली. काही दिवसांपूर्वी मोर्शी येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयात अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांच्या निवृत्ती वेतनात घोळ झाल्याचे उघड झाले होते. त्यावेळी लेखाधिकारी पदावरील हरीश शहाने निवृत्ती वेतन काढण्यासाठी मंजुरी दिल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला होता. १३ ते १८ मार्च दररोज सकाळी १० वाजता हरीश शहाला मोर्शी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने हरीश शहा शनिवारी सकाळी १०.१० वाजता पोलीस ठाण्यात गेला. मात्र १० मिनीट उशिरा आल्याने पोलिसांनी पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप हरीश शहा याने केला आहे. सद्यस्थितीत हरीश शहाचा उपचार इर्विन रुग्णालयात सुरु आहे. रविवारी मुस्लिम हेल्पलाईनचे अध्यक्ष हाजी रम्मुसेठ, इरफान अतर अली, काजी आहत अली, आसिफ खान, बल्ली सेठ, तनविर नईम, अनिल खरपे, किशोर साहू, सल्लाउद्दीन आदिनी हरिष शहाची भेट घेतली, तेव्हा हरीशने अन्याय होत असल्याचे हेल्पलाईन सांगितले. पोलिसांनी सव्वा लाखांची मागणी केली व त्याने ५० हजार पोलिसांना दिले. याबाबत पोलिसांशी संवाद झाला व त्याची रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आहे, अशी माहिती त्यााने हेल्पलाईनला दिली. हरीशवरील अन्यायाविरोधात हेल्पलाईन ग्रामीण पोलीस अधीक्षकाकडे न्याय मागण्यासाठी जाणार आहे.
त्याच्याजवळ पोलिसांनी पैसे मागितल्याचा पुरावा
By admin | Updated: March 16, 2015 00:18 IST