अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिक्षकदिनी ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भाषणाचे थेट प्रक्षेपण अमरावतीसह राज्यातील प्रत्येक शाळेत केले जाणार आहे. याबाबतचे आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काढले आहेत. मात्र जिल्ह्यातील सुमारे एक हजार ६७५ जिल्हा परिषद शाळांपैकी १०० शाळांमध्ये वीज पुरवठा आणि टीव्ही रेडीओंची व्यवस्था नाही. परिणामी १००० विद्यार्थी पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकण्यास मुकणार आहेत.शुक्रवार ५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास देशातील विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी केंद्रीय शिक्षण सचिवांनी पत्र लिहून पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यातही सर्व शाळांमध्ये याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरम्यान किती शाळांमध्ये टीव्ही नाही याची माहिती ३० आॅगस्टपर्यंत केंद्र शासनाला सादर करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पाठविली आहे. पंतप्रधानांचे हे थेट भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे यासाठी टीव्हीपासून ते आसन व्यवस्थेची जबाबदारी मुख्याध्यापकांची असणार आहे. वीजपुरवठा किंवा जनरेटरची व्यवस्थाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सक्तीच्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणे मुख्याध्यापकांपुढे मोठा पेच उभा राहिला असून ही सक्ती आता चर्चेचा विषय बनली आहे. शिक्षकदिनी दुपारी ३ ते ४.४५ या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होणार आहे. सर्वच शाळांना सहभाग नोंदविणे बंधनकारक असल्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. ज्या शाळेत टीव्ही नसेल किंवा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये उसनवारीवर टीव्ही बसविण्याच्या सूचना आहेत.
पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद, साहित्य उसनवारीसाठी धावपळ
By admin | Updated: September 3, 2014 23:01 IST