शिक्षकांचाही सन्मान ; गटसाधन केंद्राचा उपक्रम
चांदूर रेल्वे :- बालिका दिन म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाकाळात जिल्हा परिषद शाळेतील बालकांना शिकविणाऱ्या शिक्षकमित्रांचा गौरव स्थानिक गटसाधन केंद्राच्यावतीने करण्यात आला. यासोबतच ‘शाळा विद्यार्थ्यांच्या अंगणी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या शाळांना बक्षीस देत शिक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
स्थानिक गटसाधन केंद्रात हा बक्षीस समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवाज्येष्ठ केंद्रप्रमुख अरुणा दुधे होत्या. गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर, विस्तार अधिकारी विंचूरकर, केंद्रप्रमुख वंदना शेळके, केंद्रप्रमुख राजेंद्र घड्डीनकर प्रमुख अतिथी होते. ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे काम जिल्हा परिषद शाळेच्यावतीने करण्यात आले. त्यातच तालुक्यात राबविण्यात आलेला ‘शाळा विद्यार्थ्यांच्या दारी’ या उपक्रमात ज्या शाळेने अतिउत्कृष्ट काम केले, त्यांना प्रथम, द्वितीय असे क्रमांक देऊन गौरविण्यात आले. त्यात तालुक्यातून द्विशिक्षकी शाळांमधून टेंभुर्णी, तर बहुशिक्षकी शाळांमधून पळसखेड येथील जिल्हा परिषद शाळेला बक्षीस मिळाले. तालुक्यात शिक्षक नसताना विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करणारे शिक्षकमित्र तसेच ऑनलाइन माध्यमातून शिक्षण देणारे शिक्षक व विषयसाधन व्यक्ती, विशेष तज्ज्ञ, विशेषशिक्षक यांनाही सन्मानित करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. संचालन विवेक राऊत यांनी केले. आभार श्रीनाथ वानखडे यांनी मानले.