अमरावती : सेमाडोह येथील प्रभारी मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्येचा मुद्दा आता पेटू लागला आहे. नकाशेंच्या सासऱ्यांनी केलेल्या तक्रारीत आमदारांसह नऊ जणांची नावे असताना एकाच उपशिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यामागे षड्यंत्र असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. चिखलदरा पोलिसांवर राजकीय दबाव आल्याने या प्रकरणाशी सुतराम संबंध नसलेल्या उपशिक्षणाधिकाऱ्यांना मुद्दाम गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया विविध शिक्षकांनी दिली आहे. पीआरसी सदस्यांनी अपमानित केल्याने नकाशे यांनी आत्महत्या केल्याचे सार्वत्रिक मत असताना इतर ८ जणांना वगळून पंडागळेंवर गुन्हा दाखल करण्याची चिखलदरा पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पोलिसांनी राजकीय दबावाचा आरोप फेटाळला असला तरी युती शासनाच्या काळात भाजप आमदारांवर गुन्हे दाखल तरी कसे करावेत, असा यक्षप्रश्न पोलिसांवर उभा ठाकला व त्यातून पळवाट शोधली गेल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी पंडागळे यांच्याविरुद्ध ७ नोव्हेंबरला गुन्हा दाखल केल्याचे चिखलदऱ्याचे ठाणेदार नितीन गवारे यांनी सांगितले. पहिल्या तक्रारीत पंडागळेंचे नाव असल्याचा दावासुद्धा चिखलदरा पोलिसांनी केला. या पार्श्वभूमिवर शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून १५ आॅक्टोबरला सेमाडोह येथे गेलेल्या पंडागळेविरुद्ध गुन्हा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
‘पीआरसी’ला ‘क्लिनचिट’ संशयाच्या भोवऱ्यात
By admin | Updated: November 15, 2015 00:10 IST