विद्यापीठात कुलगुरू निवड प्रक्रियेला प्रारंभ, व्यवस्थापन परिषद, विद्वत परिषदेची संयुक्त बैठक
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. त्याअनुषंगाने त्रिसदस्यीय समितीत सदस्य म्हणून आयआयटी वाराणसीचे संचालक प्रमोद कुमार जैन हे असणार आहे. सोमवारी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषदेच्या संयुक्त बैठकीत जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रदीप खेडकर यांनी जैन यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि त्याला मीनल ठाकरे यांनी अनुमोदन दिले.
विद्यमान कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ जून २०२१ मध्ये संपणार आहे. सहा महिने अगोदर नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करावी लागते. त्याअनुषंगाने लोकसभेमार्फत स्थापित राष्ट्रीय शैक्षणिक संस्था असलेल्या वाराणसी येथील आयआयटीचे संचालक प्रमोद कुमार जैन यांच्याकडे अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू निवडीच्या सदस्यपदाची धुरा साेपविण्यात आली. जैन यांची निवङ झाल्याबाबतची माहिती राज्यपालांकडे पाठविली जाणार आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे विद्यापीठाचे नवे कुलगुरू निवड प्रक्रियेच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश वा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची निवड करतील, अशी माहिती आहे. तर समितीचे सदस्य सचिव म्हणून राज्याचे उच्च व शिक्षण विभागाचे प्रधान सचिव असणार आहे. नागपूर येथील सेवानिवृत् संचालक पी.बी. कोठारी, जबलपूर येथील आयआयटीचे संचालक संतोष कुमार आणि वाराणसी येथील प्रमोद कुमार जैन यांचे सदस्य निवडीसाठी अर्ज सादर झाले होते. त्यापैकी पी.बी. कोठारी यांचा अर्ज रद्द झाला. संतोष कुमार यांनी अर्ज विड्रॉल केला, हे विशेष.