महापालिका आमसभा : दोन तास घमासान चर्चाअमरावती : महापालिका आयुक्तांसह पालकमंत्री प्रचंड ऊर्जावान आहेत. त्यांच्याच पाठपुराव्याने पहिल्यांदाच जात विरहित घराची योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे पक्षभेद विसरून सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नगरसेवक प्रदीप बाजड यांनी व्यक्त केली आणि लगोलग आमसभेत श्रेयावादाची लढाई रंगली. बाहेर तापते ऊन्ह असताना सभागृहही हॉट झाले होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजता आमसभेला सुरुवात झाली. महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सुरुवातीला प्रश्नोत्तरांचा तास रंगला. आयुक्तांशी या प्रकरणावर चर्चा झाली. यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिका कर्मचारी व इतरांना घरे उपलब्ध करून देण्याचा मुद्दा होता. यावर सुरुवातीला प्रकाश बनसोड यांनी सभागृह डोक्यावर घेतले. डीपीआर मंजूर नसताना प्रस्ताव पाठविण्याची काय घाई होती, असा प्रश्न करत अन्य दोन घटकांना वगळण्यात आल्याचा आक्षेप नोंदविला. केवळ संख्यात्मक प्रस्ताव पाठविण्यात आले, त्याला कुठलाही आधार नाही, त्यामुळे जिआरला काय अर्थ उरला, असा सवाल बन्सोड यांनी उपस्थित केला. तांत्रिक समिती केव्हा ?अमरावती : या योजनेतील पहिल्या दोन घटकांना अमरावती शहरातून बादच करण्यात आले. झोपडपट्टीवासियांनाच घराची सर्वाधिक निकड आहे. कुठलीही तांत्रिक समिती स्थानिक स्तरावर बनली नसताना, छानणी झाली नसताना जे प्रस्ताव पाठविण्यात आले, त्यावर बन्सोड, प्रदिप दंदे आदिनी आक्षेप नोंदविला. प्रदीप बाजड यांच्याकडून कौतुकबन्सोड हे या प्रस्तावावर बोलत असताना प्रदिप बाजड उभे राहिले व त्यांनी प्रधानमंत्र्यासह या योजनेच्या अमंलबजावणीसाठी आयुक्त गुडेवार आणि पालकमंत्र्याचे कौतूक केले. त्यावर बाजड चापलुशी करतात, ते सर्वच आयुक्तांचे कौतूक करतात, असा आरोप संजय अग्रवाल यांच्याकडून करण्यात आला. या आरोपाना काही काळ शाब्दिक चकमक रंगली होती. चांगल्याला चांगलेच म्हटले पाहिजे, असे सांगत बाजड यांनी धनादेश वाटप आणि मुरुमाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर जनकल्याण आघाडीच्या कुसूम साहू आणि बसपाचे अजय गोंडाणे चांगलेच संतापले, बाजड यांच्यावर त्यांनीही आरोप केले. हा विषय चिघळत असताना जेष्ठ नगरसेवक विलास इंगोले यांनी वैयक्तिक टीका टिप्पणी टाळण्याचे आवाहन केले. या मुद्यावरून आमसभेमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाली. पालकमंत्री पोटेंचे नाव चालत नसेल तर ते मी वगळतो. मात्र, आयुक्तांच्या पाठपुराव्याला गुण दिलेच पाहिजे, असे आग्रही भूमिका बाजड यांनी घेतली. बाजड आणि प्रकाश बन्सोड यांच्यात राजकीय फैरीही झडल्यात. या प्रकारामुळे सभागृहातील राजकीय हेवेदावे प्रकर्षाने समोर आले.देशमुख-गुडेवारांच्या भूमिकेवरही चर्चाशहरातील घरकूल मंजुरीच्या विषयावरून आमदार सुनील देशमुख आणि आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्वतंत्र भूमिका मांडली, त्यावरही वस्तुस्थिती आमसभेमध्ये विशद करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत वानखडे यांनी केली. त्यावर गुडेवार यांनी घरकुलांना मंजुरी मिळाल्याचे ठामपणे सांगितले. मंजुरीचे अधिकार राज्य शासनाला असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यावर अन्य नगरसेवकांनीही योजनेची वस्तुस्थिती जाणून घेतली. ओगले-मकेश्वर रुजू होणारमहापालिकेचे सहायक आयुक्त राहुल ओगले यांना सेवेत घेण्याच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दिली. सेवेत परत घेतल्यानंतर त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाईल. आयुक्तांनी त्यांच्या सक्तीने सेवानिवृत्तीच्या शिक्षेचा प्रस्ताव आमसभेसमोर ठेवला होता. याखेरीज झोन क्रमांक ५ चे निलंबित सहायक आयुक्त सुषमा मकेश्वर यांनी कोर्ट केस मागे घेतल्यास त्यांना पूर्ववत रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालकमंत्र्यांच्या कौतुकाने स्वकीयांत पोटदुखी
By admin | Updated: March 19, 2016 23:57 IST