धडक : भातकुली, अमरावती, मोर्शी, तिवस्यात अनियमित वीजपुरवठा लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली, अमरावती, मोर्शी व तिवसा तालुक्यांत अनेक दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा होत आहे. वारंवार वीज खंडित होते, तर कित्येकदा कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. अशात विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देत नसल्याने आ. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी वीज कंपनीच्या मुख्यालयावर धडक देऊन अधीक्षक अभियंत्यांची झाडाझडती घेतली. आठवडाभरात या सर्व समस्या निकाली न काढल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा ताबा घेऊ, असा दम यावेळी त्यांनी दिला. भातकुली, अमरावती, मोर्शी व तिवसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी विद्युत दाब, मोठ्या प्रमाणात होणारे भारनियमन तसेच अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्यामुळे व विद्युत पोल वाकल्यामुळे या गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. यामुळे जिवितहानी होण्याचा धोेका निर्माण झाला आहे. याबाबत शेतकरी व नागरिकानी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यात. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात, अशा गंभीर तक्रारी देखील नागरिकांनी आ. यशोमती ठाकूर यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन आ. यशोमतींनी अनेक कार्यकर्त्यांसह थेट अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय गाठून उपस्थित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ग्रामीण भागातील नागरिक व शेतकरी आधीच संकटामुळे त्रस्त झाला असताना महावितरणद्वारे ग्राहकांना अशी वागणूक दिली जात असेल व कारवाई केली जात नसेल तर संंबंधित कार्यालयाचा ताबा घेण्याचा इशारा आ.यशोमतींनी दिला. यावेळी जि.प.बांधकाम सभापती जयंत देशमुख, मुकद्दर खाँ पठाण, बाळासाहेब देशमुख, गजानन राठोड, अभिजित बोके, वीरेंद्र जाधव, हरिश मोरे, गिरीश देशमुख, राजेंद्र निर्मळ, नरेंद्र मकेश्वर, राजेश ठाकरे, जितेंद्र ठाकूर, कळसकर गुरूजी, ज्योती ठाकरे, शिल्पा महल्ले, शेखर औघड, अभय देशमुख, सुनील जुनघरे, शैलेंद्र लव्हाळे, भूषण पाटील, गजानन घोडे, नौशाद पठाण आदी उपस्थित होते.
वीज अधिकाऱ्यांना अल्टिमेटम
By admin | Updated: June 7, 2017 00:11 IST