पुष्प पहिले : डॉ.पंजाबराव देशमुख व्याख्यानमाला अमरावती : नापिकी असताना देखील १९७२ मध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. परंतु आजमितीला नापिकी सोबत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे हा दुर्देवी प्रसंग शेतकऱ्यांवर का आला, या गंभीर समस्येचा शोध घेणे गरजेचे असून मुक्त अर्थव्यवस्थेमुळेच शेतकऱ्यांचा घात झाल्याचा आरोप विजय जावंधिया यांनी केला. श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा आयोजित डॉ.पंजाबराव देशमुख व्याख्यामालेचे प्रथम पुष्प विजय जावंधिया यांनी गुंफले. व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, समिती सचिव प्राचार्य स्मिता देशमुख, राजेश मिरगे उपस्थित होते. शेतीचे अर्थशास्त्र या विषयावर बोलताना त्यांनी आजचा आणि कालचा शेतकरी या परिस्थितीबाबत सविस्तर दाखले दिले. बाजारपेठेम्त मालाची मंदी असतानाही आयात वस्तुवर कर लावला जात नाही. त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. खुल्या व मुक्त अर्थव्यवस्थेमुळे शेतकरी मरणासन्न अवस्थेत सापडला आहे. शेतकऱ्याचे अर्थशास्त्र पूर्णत: कोलमडून गेले आहे. शेतात राबणाऱ्या मजुरांची मजुरी वाढल्याशिवाय गरिबी कशी दूर होणार हा प्रश्न निर्माण होतानाच जावंधिया यांनी शासनाच्या अन्न सुरक्षा बिलाला विरोध दर्शवीत हे गरिबांना गुलाम बनविणारे शस्त्र असल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पडत असताना आयात होणाऱ्या वस्तुवर कर लावल्या जात नाही. याबाबत शंका उपस्थित करून शेतीचे खरे अर्थशास्त्र बाहेर का येत नाही, कोण ते लपविते याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांचे विक्रमी उत्पन्न दाखविले जाते. परंतु त्याचे कष्ट, त्या पिकामुळे आत्महत्या केलेल्या व उद्धवस्त झालेल्या कुटुंबाची स्टोरी कोणी दाखवत नाही. आपण जी व्यवस्था स्वीकारली तिच्याविरुद्ध उभे राहून हक्क मागणारी शेतकऱ्यांची मजबूत संघटना उभी व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. शेतीचा विकास हे शेतकऱ्यांच्या वाढलेल्या उत्पन्नावर मोजावे. आज विविध प्रकारचे आयोग, नीती ठरविले जाते. परंतु शेतकऱ्यांना कुठलाही नीती, वेतन आयोग नाही. आजच्या खाऊजा संस्कृतीत शेतीचे प्रश्न हरविले आहे. नुसती ग्रामगीता वाचली तरी शेतीचे अर्थशास्त्र बरोबर होऊ शकते, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणातून अरुण शेळके यांनी शेतकऱ्यांचा कणा मोडणारा खरा गुन्हेगार राजसिंहावर बसलेला आहे, असा आरोप केला. मजुराला मिळते तेवढाही रोज शेतकऱ्याच्या नशिबी पडत नाही. कृषक उन्नतीचा वारसा शेतकऱ्यांनी जोपासावा. शेतकऱ्यांची ताकद दुर्लक्षित करून चालणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य स्मिता देशमुख, संचालन राजेश मिरगे व आभार प्रदर्शन किशोर फुले यांनी केले. कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य वि. गो. भांबुरकर, स्वीकृत सदस्य प्राचार्य वि. गो. ठाकरे, अरुण सांगोळे, अरविंद मंगळे, दिलीप जाणे, प्राचार्य चिखले, प्राचार्य वनिता काळे व संस्थेचे सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुक्त अर्थव्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचा घात : विजय जावंधिया
By admin | Updated: December 24, 2016 01:43 IST