अमरावती : राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून राज्यातील अपात्र शिधापत्रिका शोधमोहिमेला प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली. याबाबतचे आदेश नुकतेच पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिका शोध घेऊन त्या रद्द करण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या होत्या. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया मानली जाते. राज्य शासनाकडून रास्त भाव दुकानातील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. यासाठी पुरवठा विभागासह महसूल यंत्रणेतील शासकीय कर्मचारी तलाठी यांची मदत घेण्यात आली. राज्यातील कार्यरत बीपीएल, अंत्योदय व अन्नपूर्णा केसरी, शुभ्र व आस्थापना या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांच्या तपासणीसाठी शोधमोहीम १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत राबविण्याची होती. मात्र, ही मोहीम सुरू असताना स्थगिती आली आहे. अपात्र शिधापत्रिकांची माहिती घेऊन शिधापत्रिका रद्द व त्या प्रमाणात रास्त भाव दुकान कडून कोटा कमी करण्यात येणार होता. अपात्र शिधापत्रिकेबाबतचा अहवाल १५ मे २०२१ पर्यंत शासनास सादर करण्यात येणार होता. तसेच दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती स्थलांतरित व्यक्ती मय्यत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळता येणार होते. परंतु आता या मोहिमेला शासन स्तरावरून स्थगिती दिल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे.