रस्त्यावर खड्डेच खड्डे : नागरिक त्रस्त
टाकरखेडा संभू : भातकुली, चांदूर बाजार तालुक्याची सीमा जोडणाऱ्या साऊर ते तळवेल या दीड किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या मार्गावर टाकरखेडा संभू, साऊर, आष्टी, जळका हिरापूर, रामा, देवरी निपाणी, लसनापूर, कृष्णापूर तसेच चांदूर बाजारकडे जाणारे रस्ते आहेत. त्यामुळे साऊर ते तळवेल या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच मुळात या मार्गावरून चालताना कळत नाही. खड्डयांमुळे नागरिकांना पाठीच्या मणक्यांच्या आजाराने ग्रासले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्याची कित्येकदा थातूर-मातुर डागडुजी केली जाते. याकरिता लाखोंचा खर्चदेखील केला जातो. डागडुजीनंतर लगेचच रस्ता उखडतो, असे या रस्त्याचे वास्तवदर्शी चित्र आहे.