खड्डेच खड्डे, शेतकरी, प्रवासी, शिक्षक, विद्यार्थी त्रस्त
अंजनगाव बारी : रायसोनी विद्यापीठ ते राम मेघे इंजिनीअरिंग कॉलेज ते बडनेरा जुनी वस्ती हा मार्ग पूर्णपणे खराब झालेला आहे. रस्त्यात खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासी नागरिक, व्यापारी, शेतकरी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
अंजनगाव बारी व बडनेरा मोठी बाजारपेठ असल्यामुळे शेतकरी, व्यापारी व आजूबाजूच्या १५ खेड्यातील गावकरी या मार्गाने ये-जा करतात. पारड, मालखेड रेल्वे, लालखेड ते पळसखेड, अडगाव, माजरी, म्हसला, सातरगाव, नांदगाव, टिमटाळा, सिरसाना निरसानापर्यंत लोक दररोज मजुरी कामासाठी बडनेरा ते अमरावतीला ये-जा करतात. अंजनगाव-बडनेरा या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी ऑटो वाहतूक आहे. रायसोनी विद्यापीठ हे ऑनलाईन परिक्षेचे मुख्य केंद्र आहे. तेथे परजिल्ह्यातील विद्यार्थी परिक्षेसाठी येतात. शहर तथा खेडयापाड्यांतील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येतात. बांधकाम विभागाने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.