अमरावती : स्थानिक मोतीनगर चौकात २५ जुलै रोजी दुपारी झालेल्या अंशुल इंदूरकर याची हत्या करण्यात आली. त्या प्रकरणाचा तपास करताना इन्स्टाग्रामवरील ‘सीताराम गॅंग एमएच २७’ हा ग्रुप पोलिसांच्या रडारवर आला आहे. या प्रकरणातील आरोपी कार्तिक जाधव या ग्रुपला फॉलो करीत असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांच्या हाती आली आहे. पोलीस त्या दिशेनेदेखील तपास करणार आहेत.
अंशुलची २५ जुलै रोजी जुन्या वैमनस्यातून चायना चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर लगेचच अक्षय ऊर्फ सोनू पवार, निखिल ऊर्फ मोनू पवार या दोन भावांसह दीप कपिले यांना अटक करण्यात आली, तर तीन अल्पवयीनांना ताब्यात घेऊन त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले. त्यातील कार्तिक जाधवने त्यावेळी तो सज्ञान नसल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी त्याची टीसी व अन्य कागदपत्रे मिळवून तो सज्ञान अर्थात १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचा असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशावर फ्रेजरपुरा पोलिसांनी कार्तिक जाधवला ताब्यात घेतले. त्याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घटनेत वापरलेला चाकूदेखील जप्त करण्यात आला आहे.
ग्रुप आक्षेपार्ह?
‘एमएच २७ चे बाप’, ‘अमरावतीकर, इधर सब चलते’, ‘खुदके दम पर है’ अशी टॅगलाईन या ग्रुपमध्ये वापरली गेली आहे. मोतीनगरातील खूनप्रकरणातील आरोपी कार्तिक जाधव हा त्या ग्रुपला फॉलो करीत असल्याने पोलीस त्या दिशेनेदेखील तपास करणार असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोेलीस अधिकाऱ्यांनी दिली.