बडनेरा हादरले : आणखी दोन घरफोड्या, पोलिसांसमोर आव्हानबडनेरा : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटनांची मालिका सुरु आहे. दरदिवसाला घरफोडीच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांचा उच्छाद सुरुच आहे. यातच मंगळवारी रात्री दोन घरफोडीच्या घटना घडल्याने बडनेरा शहर पुरते हादरले आहे.शेख वसीम शेख कादर (२१), पटेलनगर व शेख रशीद शेख मुसा (४०) दोन्ही (रा. चंद्रानगर) अशी चोरीच्या घटनांमधील फिर्यादींची नावे आहेत. मंगळवार २४ जून रोजी मध्यरात्री दीड वाजता शेख वसीम यांच्या घरात चोरट्यांनी मागच्या बाजूने प्रवेश केला. समोरासमोर दोन खोल्या आहेत. घरातील सर्वजण ज्या खोलीत झोपले होते त्या खोलीचा बाहेरुन कडीकोंडा लावून दुसऱ्या खोलीत चोरट्यांनी प्रवेश केला. या खोलीतून लोखंडी पेटीतील ३ हजार रुपये किमतीचे १० नग चांदीचे छडे, १० हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे मनी तसेच रोख २० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. घरात चोरटे शिरल्याचे घरातील मंडळींच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यामुळे चोरट्यांनी घरातून मुद्देमालासह पोबारा केला. चोरट्यांची संख्या तीन असल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली. पटेलनगराला लागूनच अमरावती रेल्वे ट्रॅक आहे. त्या भागाकडून हे चोरटे पसार झाले. याच रात्री याच परिसरातील शेख रशीद शेख मुसा यांच्या घरीदेखील चोरट्यांनी घरातील अलमारी, सुटकेस उघडून रोख दोन हजार व एक मोबाईल असा चार हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी भादंविच्या कलम ४५७, ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञाला बोलाविण्यात आले. रेल्वे ट्रॅक मार्गे बायपासपर्यंत श्वान पथक दिशा दाखवू शकले. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू, गुन्हे शाखेचे निरीक्षक आत्राम, उपनिरीक्षक पेंदोर यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांवर चोर भारीच
By admin | Updated: June 25, 2014 23:30 IST