बुद्ध जयंती साजरी : एकाच वेळी ११०० बंदीजणांचे सामूहिक भोजनअमरावती : मध्यवर्ती कारागृहात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बंदीजणांनी गौतम बुद्धांच्या संदेशाचे अनुकरण करण्याची शपथ घेतली.संत गाडगेबाबा प्रार्थना मंदिरात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक जयंत नाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ तुरुंगाधिकारी नितीन क्षीरसागर, अंतर्गत सुरक्षा अधिकारी प्रशांत नागोडे, सुभेदार पवनकुमार पांडे, गोपाल नांदे, प्रशिक्षक भूषणकुमार कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी कारागृह अधीक्षक जयंत नाईक यांनी बुद्ध जयंती ही कारागृहात साजरी करण्यामागील भूमिका विशद करताना त्यांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान हे जगाला तारणारे आहे. तथागत गौतम बुद्धाने दिलेल्या शांती, अंहिसेच्या मार्गाने वाटचाल केली तर पुन्हा कारागृहात येण्याचा मार्ग बंद झाल्याशिवाय राहणार नाही. गौतम बुद्धाची शिकवण ही कु ण्या जाती, धर्मासाठी नसून ती एक विचारधारा आहे. त्यामुळे बुद्धाची शिकवण प्रत्येकाने अंगिकारली तर नक्कीच माणूस म्हणून समाज स्वीकारणार असे त्यांनी निक्षून सांगितले. सामूहिक बुद्ध वंदनेला कारागृहातील सर्व जाती, धर्माचे कैदी बांधव हजर होते. यावेळी बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमासाठी हिरारीने सहभाग घेणारे रामेश्वर मुदगल यांचा कारागृह प्रशासनाच्यावतीने गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)सामूहिक भोजनातून एकोपा साधलाकारागृहात काही दिवसांपूर्वी हनुमान जयंती निमित्त सामूहिक भोजनाचा उपक्रम राबविण्यात आला. बुद्ध जयंतीचे औचित्य साधून शनिवारी कारागृहात सामूहिक भोजन बंदीजणांना देण्यात आले. सामूहिक भोजन या उपक्रमातून कैदी बांधवांनी एकोपा साधला. शांती, अंहिसेच्या अनुकरणाची शपथ घेताना हातून झालेल्या चुकांचे प्रायश्चितदेखील कैद्यांनी केले.
कारागृहात शांती, अहिंसा अनुकरणाची शपथ
By admin | Updated: May 24, 2016 00:36 IST