अमरावती : ग्रामीण भागात वीज जाण्याचे प्रमाण कमी व्हावे आणि कृषी पंपांसाठीही वीज मिळून शेतीकामे सुलभ व्हावीत यासाठी देशासह राज्यात नव्याने दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सुरू असलेल्या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचे नाव बदलवून केंद्र शासनाने दिनदयाल उपाध्याय योजना सुरू केली. मात्र योजनेतील उद्देश जुनेच ठेवण्यात आले आहेत. गुजरातमधील प्रतिसाद लक्षात घेता ही योजनेला संपूर्ण देशात व राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना केवळ ग्रामीण भागासाठीच आहे. त्यामध्ये शेती आणि बिगरशेती असे दोन वेगवेगळे फिडर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतीपंपांना वीज मिळेल. त्यामुळे मोटार जळण्याचे प्रमाणही कमी होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी मीटर बसविण्यात येणार असून उपकेंद्र फिडर्स, वितरण संहित्रे आणि ग्राहकांचे एनर्जी आॅडिटही करण्यात येणार आहेत. यापूर्वीही राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत फिडर वेगळे करण्याचे काम करण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून या योजनेसाठी ४३ हजार ३३ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची गरज भासणार आहे. यामध्ये शासन ३३ हजार ४५३ कोटींची मदत करणार आहे. ग्रामीण विद्युतीकरण योजनेचे सशक्तीकरण हा या योजनेचा चेहरा असून यामध्ये येणाऱ्या विविध घटकांसाठी आराखडा तयार करून तो केंद्र शासनाकडे पाठविला जाणार आहे. या योजनेकरिता ग्रामीण विद्युतीकरण समिती नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. ही समिती ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे. योजनांना मंजुरी देणे आणि त्याची पाहणी करणे, असे काम करावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)
योजना तीच केवळ नावात बदल
By admin | Updated: March 1, 2015 00:22 IST