बच्चू कडू : सिंचन भवनात बैठक
अचलपूर : येत्या उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येऊ नये, यासाठी पाण्याची समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात यावे तसेच चार महिने पुरेल असा पाणीपुरवठा होण्यासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
अमरावती येथील सिंचन भवनात ना. कडू यांनी जलसंपदा विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य अभियंता अनिल बहादुरे, अ.ल. पाठक, अधीक्षक अभियंता आशिष देवगडे, रश्मी देशमुख, नरेंद्र तायडे आदी उपस्थित होते.
नांदगावपेठ येथील ३२ गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नांदगावपेठ औद्योगिक क्षेत्रातूनच या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबत आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश देऊन ना. कडू यांनी बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव, खडकपूर्णा आणि पेनटाकळी प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पाचा दोन हजार कोटी खर्च शिल्लक आहे. याबाबत प्रस्ताव सादर करावा. यात बुलडाणा येथील भूसंपादन प्रक्रियेस प्राधान्य देण्यात यावे. भूसंपादन आणि पुनर्वसन याबाबींवर ४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. प्रकल्प वेळेत आणि वेगाने पूर्ण व्हावेत, यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावे. या प्रस्तावित कामाचा शासनाकडे पाठपुरावा करावा. संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारींचा निपटारा करावा. भूसंपादनाबाबत लवचीकता नसावी, तक्रारींचे निवारण करावे. याबाबत नियमांचे पालन करण्यात यावे तसेच जिगाव प्रकल्पाच्या तक्रारींचे प्राधान्याने निवारण करावे, अशा सूचना त्यांनी दिला.
----------