वळण मार्गावर अपघाताचा धोका : सात वर्षांपासून रस्ते विकासाची कामे रखडलीपेठ मांगरुळी : दिवसभर वर्दळ असलेल्या जरूड-पेठमांगरुळी या मार्गावर काटेरी झुडुपे, बाभळीची झाडे रस्त्यावर आल्याने व रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. वाढत्या काटेरी झुडुपांमुळे दुचाकी, चार चाकी व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. पेठमांगरुळी-जरुड मार्गावरून लोणी, सावंगा, करजगाव, काचुर्णा, पेठमांगरुळी, वावरुळी आदी गावांतील शेकडो वाहने ये-जा करतात. या परिसरातील गावांचा वरूडला व बाहेरगावी जाण्यासाठी हाच प्रमुख मार्ग आहे. परंतु रस्ता अतिशय अरूंद, काटेरी झुडपांनी वेढला असल्यामुळे व रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालवणे दुरच पायदळ चालणे दुरापास्त झाले आहे. वळण मार्गावर अपघात होत आहेत. या काटेरी झुडुपांमुळे समोरून येणारे वाहनच नजरेस पडत नाही. दोन वाहन एकाच वेळी आल्यास झुडपाची काटे प्रवाशांना रुततात दिवसेंदिवस या झाडांचा त्रास वाढत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या सात वर्षापासून या रस्त्याचा विकास खुंटला आहे. जिल्हा परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधीचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या भागातून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी एक वेळ तरी या रस्त्यावरून प्रवास करावा व रस्त्याचे निरीक्षण करावे, असे नागरिक बोलत आहे. जिल्हा परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरणासाठी चक्काज आंदोलनाचा इशारा दिला. (वार्ताहर)
पेठमांगरुळी-जरूड रस्त्याला काटेरी झुडुपांचा विळखा
By admin | Updated: December 19, 2015 00:21 IST