परतवाडा : विनापरवाना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहतूकदारांनी परतवाडा बसस्थानका बाहेरील २०० मीटरच्या नो पार्किंग झोनमध्ये बस उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. बसस्थानक परिसरातून प्रवाशांची उचल ते करीत असल्यामुळे एसटी महामंडळाला लाखोचा फटका बसत आहे.
एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी अवैध प्रवासी वाहतुकीच्या मुद्द्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांना सविस्तर पत्र दिले आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध आणि नो पार्किंग झोन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाईचे आदेश देण्याबाबत सुचविले आहे. परतवाडा बसस्थानकासमोरून दररोज ८० ते ९० बस विनापरवाना प्रवासी वाहतूक करीत असल्याचे विभागीय नियंत्रकांनीपत्रात म्हटले आहे. या बसचे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील प्रवासी वाहतुकीचे मूळ परवाने व वेळापत्रक तपासण्याची मागणीही या पत्रात विभागीय नियंत्रकांनी केली आहे.
दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी अशा विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस बंद करण्याबाबत परतवाड्यातील दोन, आकोट व अंजनगाव सुर्जी येथील प्रत्येकी एक अशा चार बस संचालकांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये परिवहन अधिकाऱ्यांनी त्या वाहनांचे नंबरही नमूद केले. यात काही वाहने मध्यप्रदेश पासिंगची आहेत. परतवाड्यातून होणाऱ्या विनापरवाना अवैध प्रवासी वाहतूकदारांमध्ये वाद जुनाच आहे. यातून एकमेकांविरुद्ध तक्रारीही घडत आहेत. असे असतानाही ही विनापरवाना अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे.
दरम्यान, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील आंतरराज्य प्रवासी वाहतुकीच्या अनुषंगाने प्रपोज्ड एग्रीमेंट असताना, परिवहन आयुक्तांकडून दिल्या गेलेल्या चुकीच्या परवान्यामुळे हा गोंधळ उडाल्याची माहिती आहे. या चुकीच्या परवान्यामुळे राज्यात एसटी महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. विनापरवाना अवैध अशा टप्पा वाहतुकीने अमरावती प्रादेशिक विभागात कळस गाठला आहे.