कार्बाईडचा वापर : एफडीए अधिकाऱ्यांची कानउघाडणीअमरावती : आंबे, केळी पिकविण्यासाठी कार्बाईडसारख्या रसायनांना होत असलेल्या घातक वापरावर नियंत्रण आणण्यात अन्न व औषधी प्रशासन अपयशी ठरल्यामुळे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्याशी थेट संपर्क साधून अमरावतीचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके आणि सहाय्यक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या कार्यप्रणालीची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली. ‘लोकमत’ने फळे पिकविण्यासाठी होत असलेल्या कॅल्शियम कार्बाईड आणि इथिलिन गॅसच्या घातक वापराबाबत शोधवृत्त मालिका प्रकाशित केली. त्याअनुषंगाने पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. अलिकडेच एफडीएचे मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वात कार्बाईडयुक्त आंबे भर बाजारात एफडीएच्या शासकीय वाहनाने चिरडण्यात आले होते. मुळात ते आंबे जमिनीत पुरविण्याचा नियम आहे. एफडीएच्या या कृत्याने रोगराईचा फैलाव तर झालाच शिवाय स्वच्छ भारत अभियानालाही गालबोट लागले. पालकमंत्री पोटे यांनी ‘लोकमत’ने प्रकाशित केलेला हा किस्साही ना. बापट यांना सांगितला. पालकमंत्र्यांनी स्थानिक पातळीवर एफडीएच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे.
पालकमंत्र्यांचा बापटांना फोन
By admin | Updated: April 30, 2016 00:11 IST