शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र : सूचनांचे उल्लंघन झाल्यास कारवाईअमरावती : मुंबईजवळील मुरुडच्या समुद्रात पुण्याचे १३ विद्यार्थी बुडून मृत पावल्याच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयांना सहलीसंदर्भात २७ सूचनांचे पालन करावे, असे आदेश शुक्रवारी जारी केले आहे. त्यामुळे शाळांना सहल आयोजित करणे कठीण बाब झाली आहे. या आदेशात शाळा सहल संदर्भात सर्व सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो अशा ठिकाणी सहल आयोजित करता येणार नाही. तसेच शाळांनी प्रत्येक सहलीपूर्वी पालकांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याबाहेरील सहलींना परवानगी नाही. दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा तसेच शिक्षकांनी तंबाखू, गुटका, मादक पदार्थांचे सेवन करू नये. विद्यार्थ्यांना सहलीची सक्ती करू नये, सहलीसाठी जादा शुल्क गोळा करू नये, रात्रीच्या वेळी प्रवास टाळावा, साहसी खेळ, वॉटर पार्क, अॅडव्हेंचर पार्क असलेल्या ठिकाणी सहली काढू नये अश्या सूचना आहेत.शैक्षणिक सहली नेण्यापूर्वी दोन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहलीबाबत इत्यंभूत माहिती देण्याबाबत तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचाव करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. सोबत प्रथमोपचार पेटी असावी, विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास मुभा तसेच पालकांच्या संपर्कात राहण्याविषयी त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना सहलीला येण्याची सक्ती करू नये, ट्रॅकींग व जलक्रीडांना बंदी, जादा वर्गणी घेण्यास बंदी, सहलीमध्ये पालक प्रतिनिधी किंवा शाळेने नॉमीनेटेड केलेल्या व्यक्तीशिवाय ईतरांचा समावेश करू नये, सहल काढताना गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण प्रमुख तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सहलीबाबत लेखी माहिती द्यावी, रेल्वे फाटक व पुलाखालील पाण्याचा अंदाज घेवून सहलीचे वाहन पुढे न्यावे इत्यादी सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. कोणत्याही एका नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
अटी, शर्तींवर मिळणार सहलीची परवानगी
By admin | Updated: February 7, 2016 01:06 IST