जळगाव जामोद : जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील विद्यार्थी व नागरिक गेल्या १५ दिवसांपासून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र तसेच रमाई घरकुल योजने संबंधी जात प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी तक्रार करून पालकवर्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून करण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यापासून येथे उपविभागीय अधिकारी नसल्याने विद्यार्थी व इतर योजनांच्या लाभार्थ्यांचे नुकसान होत आहे. विद्यार्थी व पालकवर्ग चकरा मारुन बेजार झाले; मात्र ३१ जुलैपासून सर्व प्रमाणपत्र ठप्प पडलेले आहेत. त्यावर उपविभागीय अधिकारी यांच्या सह्या झाल्या नाहीत. तर स्वयंघोषणापत्राच्या वेळेवर त्रुटी काढून विद्यार्थी व लाभार्थ्यांना तात्कळत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे १९ ऑगस्ट रोजी स्थानिक तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना एक निवेदन पाठविण्यात आले असून, त्यामध्ये जळगाव जामोद उपविभागाला तत्काळ उपविभागीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर अजय वानखडे, बाबूराव इंगळे, अनंता भटकर, शुभम देवचे, विनोद जाधव, बळीराम वनारे, सचिन वानखडे, मनोज वाघ, भिका अंभोरे, परमेश्वर साबळेसह २0 जणांच्या सह्या आहेत.
एसडीओ कार्यालयात ४00 दाखले प्रलंबित
By admin | Updated: August 21, 2014 23:15 IST