अमरावती : कुठल्याही योजनेसाठी आधारकार्डची सक्ती करता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना बहुतेक एसटी वाहकाद्वारा ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट देण्यासाठी आधार कार्डची मागणी करण्यात येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अघोषित आधार सक्तीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारा ६५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटांमध्ये ५० टक्क्याची सवलत दिली जाते. अलीकडच्या काळात या सवलतीचा फायदा अनेक बोगस लाभार्थी घेत असल्याचे महामंडळाच्या निदर्शनात आले. तहसीलदारांद्वारे दिला जाणारा वयाचा दाखला व सवलतीच्या पासद्वारा अथवा मतदार ओळखपत्राद्वारा आतापर्यंत पन्नास टक्के सवलत देण्यात येत आहे. जिल्ह्यात असा प्रवास करणारे अनेक बोगस लाभार्थी आहेत. यामध्ये ५० ते ५५ वयोगट असणाऱ्या अनेक नागरिकांनी ६५ ते ७० वयोगटाचे प्रमाणपत्र मिळविले आहे. यासाठी राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रवास तिकीट देण्यासाठी आधार लिंक केल्याचे जाहीर केले. वास्तविकता याविषयीचे कोणतेही लेखी आदेश नाहीत. मात्र वाहकांकडून आधारकार्डची मागणी होेत आहे. नागपूर-अकोला बसमध्ये ज्येष्ठ नागरिक महिलेला वाहकाद्वारा आधारकार्डची मागणी करण्यात आली. आधार कार्ड जवळ नसल्याने त्या महिला प्रवाशाला पूर्ण तिकीट काढावी लागली. प्रवासी सवलत नाकारण्यात आली. महामंडळाच्या अघोषित सक्तीमुळे प्रवाशांना मन:स्ताप व गैरसोय होत आहे.
प्रवाशांना ‘आधार’ची सक्ती
By admin | Updated: March 23, 2015 00:27 IST