तालुक्यात आमदार खासदार तथा लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून अनेक गावांमध्ये प्रवासी निवारे बांधण्यात आले. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी निवाऱ्यांचा कोणताही उपयोग प्रवाशांना होत नसल्याचे लक्षात येत आहे. कावली या गावात बस येत होती, परंतु गावाबाहेरच बस थांबा असल्याने निवाऱ्याचा प्रवाशांना कोणताही उपयोग झाला नाही. अंजन्सिंगी येथील निवारे अनेकांच्या दुकानामुळे तसेच खासगी वाहने उभी करण्यात येत असल्याने या गर्दीत अदृश्य झाले असल्याचे दिसत आहे. जुना धामणगाव येथे मेन रोडवर निवारा उभा आहे. परंतु, प्रवाशांना त्याचा कोणताही फायदा दिसून येत नाही. गुंजी फाट्यावर आमदार निधीतून निवारा बांधण्यात आला. मात्र, त्या ठिकाणी कोणतेही प्रवासी त्याचा उपयोग घेत नसल्याचे समजते. काही वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने ‘गुंजी फाट्यावरील निवारा झाला जमीनदोस्त’ अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. आता तरोडा मार्गावर प्रवासी निवारा बांधण्यात आला. परंतु, त्याचा प्रवाशांऐवजी गुरे व भटक्या व्यक्ती लाभ घेत आहेत.
काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने प्रवासी निवारे प्रवाशांविना सुने झाले आहेत. अनेक प्रवासी निवाऱ्याच्या आजूबाजूला दुकाने थाटली गेली तसेच झाडे-झुडपेसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.