लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : बडनेरा रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर अर्धवट शेडमुळे रखरखत्या उन्हात उभे राहून प्रवाशांना मेमू ट्रेन पकडावी लागते. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयीबाबत कितपत गंभीर आहे, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. लहान मुलांना याचा प्रचंड त्रास येथे झेलावा लागतो आहे.कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर तब्बल चार महिन्यांपूर्वी बऱ्याच रेल्वेस्थानकावरून मेमू ट्रेन सुरू करण्यात आल्या. तेव्हाच बडनेरा रेल्वेस्थानकावरून बडनेरा ते भुसावळ आठ डब्यांची अनारक्षित मेमू सुरू झाली. ही ट्रेन रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून सुटते. या प्लॅटफॉर्मच्या अर्ध्या भागातच शेड आहे. या वर्षी उन्हाळा चांगलाच तापतो आहे. उष्माघातामुळे बऱ्याच लोकांचे जीव गेलेत. लोक आजारी पडत आहेत. येथे मात्र सोईअभावी प्रवाशांना उन्हाचे प्रखर चटके सहन करीत मेमू ट्रेन पकडावी लागते आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ ला संपूर्ण शेड उभारण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाने तत्काळ कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गामध्ये जोर धरून आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या प्रबंधकांनी याची विशेष करून दखल घ्यावी, असेही बोलले जात आहे. पुढे पावसाळा आहे. त्यापूर्वी शेड न झाल्यास प्रवाशांना नक्कीच पावसाच्या सरींनी ओले होत प्रवास करावा लागेल.
एकाच मेमूवर प्रवाशांचा भारआठ डब्यांची बडनेरा ते भुसावळ मेमू ट्रेन प्रवाशांच्या गर्दीने सारखी भरून जाते. परत येताना तेवढीच प्रवासी संख्या असते. अनारक्षित तिकीट असल्याने गावखेड्यांवरील लोक, शाळकरी विद्यार्थी तसेच शेगावला दर्शनासाठी जाणाऱ्यांची मोठी गर्दी या गाडीवर असते. कोरोनाआधी पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. त्यामध्ये प्रवासी अधिक क्षमतेने जात होते. आता मात्र केवळ आठ डब्यांच्या व एकच फेरी असणाऱ्या मेमू ट्रेनवर प्रवाशांचा अधिक भार पडतो आहे. रेल्वे प्रशासनाने बडनेरातून दोन मेमू सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांसह शहरवासीयांमध्ये आहे.