फोटो पी १६ वरूड रोड
वरूड : अमरावती-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ के चे काम दोन वर्षांपासून बंद आहे. वरूड ते पुसला मार्गावरील अनेक ठिकाणी नाल्या अपूर्ण असून, अनेक अपघात यामुळे घडले आहेत. पुसलालगत रस्ता अर्धवट व नाल्या नसल्याने अनेकांना अपंगत्व आले. सबब सदर अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या पुसला शाखेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.
महामार्गाचे काम पूर्ण झाल्याचे सांगून कंत्राटदार कंपनीने दोन वर्षांपूर्वी बांधकाम बंद केले. पुसला हे गाव वरूडपासून १० किमी अंतरावर आहे. तेथे वनजमिनीचा मुद्दा पुढे आल्याने पुसला येथून वरूडकडे येताना एक किमी अंतराचा रस्ता अर्धवट व नाल्यासुद्धा ‘जैसे थे’च आहेत. अर्धवट रस्त्यामुळे अनेकवेळा अपघात घडले, तर अनेकांना प्राणास मुकावे लागले. यामुळे सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे तसेच पुसला येथे गतिरोधक लावण्यात यावे, अशी मागणी भाजप कार्यकर्ते इंद्रभूषण सोंडे, अमित खेरडे, कृष्णा वाकडे, विलास पवार, आकाश गजबे, गजानन सोंडे, हितेश तडस, नीलेश फुटाणे, सुभाष कुयटे यांनी केली आहे.
--------------------------