अमरावती : अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचार्यांचे वेतन दुप्पट झाले आहे; मात्र, गावोगावी आरोग्य सांभाळणार्या महिला आरोग्य परिचारिकांची आर्थिक स्थिती अजूनही सुधारली नसून केवळ १२00 रूपयांमध्ये जिल्ह्यातील साडेतीनशे अंशकालीन आरोग्य परिचारिका गेल्या ३0 वर्षांपासून राबत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात अंशकालीन आरोग्य परिचारिका कार्यरत आहेत. त्यांना कोणत्याही सवलती मिळत नाहीत. अर्धवेळ परिचर म्हणून त्यांच्या कामाची नोंद होते. मात्र, दिवसभर त्यांनाही राबराब राबावे लागते. जिल्ह्यातील महिला परिचरांच्या आर्थिक मोबदल्याच्या प्रश्नासाठी अनेक वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून आंदोलने सुरू आहेत. तुटपुंज्या पगारावर राबणार्या या अंशकालीन आरोग्य परिचरांना १0 नोव्हेंबर २0१0 रोजी शासनाने परिचरांच्या मानधनात ३00 रूपये वाढ करण्याचा अध्यादेश जारी केला. मात्र, ही वाढ शासनाने एप्रिल २0१२ पासून दिली आहे. तरीही इतर कर्मचार्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत. आरोग्य परिचरांना शासनाकडून कोणत्याही प्रकाराचा प्रवासखर्च, महागाई भत्ता, पगारी रजा, सुट्टी व इतर सेवा सवलती मिळत नाहीत. त्यांची अंशकालीन कर्मचारी म्हणून नोंद होते. १९८४ पासून पन्नास रूपये मानधनावर आरोग्य परिचर म्हणून या परिचारिका काम करतात. मात्र, पुरेसा मोबदला मिळत नाही. ही समस्या सोडविण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
अंशकालीन परिचारिकांना अवघे १२00 रूपये वेतन
By admin | Updated: May 19, 2014 23:01 IST