जितेंद्र दखने - अमरावतीदुर्गम भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टीक आहार पुरविण्यासाठी मेळघाटातील आदिवासींच्या घराभोवती असलेल्या परसबागेत आता भाजीपाला व फळांची लागवड करण्याची योजना राबविण्यासाठी शासनाने ५ जानेवारी रोजी हिरवी झेंडी दिली आहे. मेळघाटसह आदिवासीबहुल भागात कुपोषणाचे प्रमाण प्रचंड आहे. आदिवासी कुटुंबांच्या घराभोवती असलेल्या परसरबागेत पौष्टीक भाजीपाला व फळांची लागवड केल्यास आदिवासींना सकस आहार मिळू शकतो. त्यामुळे या भाजीपाला व फळांची लागवड करण्यासाठी आदिवासींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने धारणी व चिखलदरा तालुक्यातील परसबागांची योजना सन २००३-०४ पासून राबविण्यात येत आहे. आदिवासींच्या आहारात जीवनसत्व व इतर आवश्यक पोषक द्रव्ये समाविष्ट करण्याच्या उद्देशाने ही पौष्टीक आहार योजना शासनाने अंमलात आणली आहे. योजना राबविण्याकरिता लागवडीचे उद्दीष्ट, लाभार्थी निवड, लावावयाची फळझाडे, भाजीपाला, लाभ द्यावयाचे साहित्य व सामुग्री पुरवठा, अंमलबजावणी करणारी यंत्रणा, लाभार्थी प्रशिक्षण, सहनियंत्रण आढावा व मूल्यमापन आणि योजनेंतर्गत तपासणीचे निकष यासाठी शासनाने धोरण ठरवून दिले आहे. या योजनेला राज्य शासनाने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात दहा लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे ही योजना अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर व इतर आदिवासीबहूल जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यामुळे मेळघाटातील वर्षानुुवर्षे गाजत असलेल्या कुपोषणाच्या समस्येला काही प्रमाणात तरी आळा बसू शकतो. कुपोषित मातांना भरपूर व सकस आहार मिळाल्यास त्यांचे आरोग्य संवर्धन शक्य असल्याचा विश्वास वर्तविला जात आहे.
आदिवासींच्या घराभोवती बहरणार परसबाग
By admin | Updated: January 7, 2015 22:44 IST