अपघाताला आमंत्रण : पोलिसांचे दुर्लक्ष
चांदूर बाजार : शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ट्रक तसेच अन्य वाहनचालक वाहने उभी करीत असल्याने हा महामार्ग अरुंद झाला आहे. परिणामी, अपघाताच्या घटनांत वाढ होत आहे. या प्रकारामुळे महामार्ग जणू वाहनतळ बनल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सुरक्षित रस्ते निर्मितीवर सध्या शासनाचा भर आहे. याच मालिकेत यात शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. सदर मार्ग हा मध्यप्रदेशला जोडला जात असल्याने या मार्गावर रात्रंदिवस जड वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर अनेकांनी रस्त्याच्या कडेलाच वाहन दुरुस्तीची दुकाने थाटली आहेत.
शहरालगत असलेल्या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने लोखंडी कठडे लावले आहे. या कठड्यांना लागूनच अनेकांनी दुकाने उभारल्याने ट्रक, ट्रॅक्टर, अनेक लहान मोठे वाहनचालक वाहन दुरुस्तीकरिता मार्गावरच थांबतात. यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण आहे. त्यातच झपाट्याने अतिक्रमण वाढत असताना राष्ट्रीय महामार्ग विभाग झोपी गेले असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.
महामार्गावर थाटली दुकाने
चांदूर बाजार, शिराजगाव बंड, जमापूर या भागात राष्ट्रीय महामार्गावर उघड्यावरच मटण विक्री, गाड्या दुरुस्तीचे गॅरेज, फळ विक्रीची दुकाने उभारली आहे. सर्वाधिक दुकाने गाड्या दुरुस्तीची असल्याने मोठमोठे वाहने मुख्य रस्त्यावरच उभी करून दुरुस्तीची कामे केली जातात. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग प्राधिकरण व्यवस्थापन व महामार्ग पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.